मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहे. दरम्यान या प्रकरणात दरदिवशी नेवे खुलासे होत आहेत. याचदरम्यान आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी संतोष देखमुख यांच्या कुटुंबाविषयी खळबळजनक दावा केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मनोज जरांगेंनी मोठा दावा केला आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन झाला तर सरपंचांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्हीचे व्हिडीओ समोर आले ही चांगली गोष्ट झाली. कट शिजत असतानाचे फुटेज बाहेर आले. आत्ता कुणाला सुटता येणार नाही. फक्त आता सरकारला एकच विनंती आहे की, या प्रकरणातील आरोपींपैकी एकाचाही जामीन होता कामा नये. जर आरोपी जामीनावर बाहेर आले तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. सुटून आल्यावर हे कुटुंबाचा मर्डर करू शकतात.
सीसीटीव्हीमधील सर्व आरोपी पाहून खरंच धक्कादायक आणि चीड येणार आहे. राज्यांने अशा गुंडगिरीचा आणि हप्ते वसुलीच्या टोळ्या या अगोदर बघितल्या होत्या. आजचा व्हिडीओ तर खूप धक्कादायक आहे. एका जागेवर बसून खंडणी मागायचा आणि खून करायचा. सामुहिक कट करायला तर संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले. तेही एका मंत्र्याच्या मदतीने … खंडणी मागणारे आणि आरोपी हे एकच आहेत ते वेगळे नाहीत. यामध्ये तीन टीम आहेत. खंडणी मागायला लावणारी वेगळी टीम, खून करायला लावणारी वेगळी टीम, आणि करून घेणारा वेगळा बसलेला सरमाड (वाल्मिर कराड) आहे.
मनोज जरांगे म्हणाले, खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामुहिक कट रचणारा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.. हा मुख्य आरोपी झाला पाहिजे. खून आणि खंडणी प्रकरणातील फरार असलेले आरोपी कोणाच्या संपर्कात होते याचे सीडीआर समोर आले पाहिजे. त्या काळात कोणत्या मंत्र्यांनी फोन केले हेही समोर आले पाहिजे. विष्णू चाटेने फोन फेकून दिला तो कसा सापडत नाही. या फरार असलेल्या आरोपींना सांभाळले कुणी? त्यांना सह आरोपी करा.
खंडणी आणि खुनाचे आरोपी एकच आहेत. संघटित गुन्हेगारी चालवणारा सर्वात मोठा आरोपी आहे. फरार असताना कोणत्या कोणत्या मंत्र्याला फोन केले . 100% फरार असताना मंत्र्यांना फोन केले. त्यांनाही सहआरोपी करा, असेही मनोद जरांगे म्हणाले.