बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्र हादरून गेला आहे.या घटनेनंतर संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणावरून अनेक बड्या नेत्यांनी संतोष देशमुख कुटूंबियांना भेट देऊन आरोपीना कठोर शिक्षा दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच सर्वच स्तरातून या घटनेवर निरनिराळ्या प्रतिक्रिया येतआहे . दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
अशा घटना महाराष्ट्रात घडतायेत हे पाहून किंवा ऐकून कुणाचा विश्वास बसणार नाही. पण आपल्या राज्याचे दुर्दैव आहे की अशा घटना आता आपल्याकडेही घडायला लागल्या आहेत. आधी महाराष्ट्रात फिरताना भीती वाटायची नाही पण आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल, याची भीती वाटते, अशी प्रतिक्रिया बीडच्या घटनेवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.
तसेच शरद पवार मस्साजोगला गेल्यानंतर बाकीचे लोक तिकडे जायला लागले. तोपर्यंत बाकी लोक तिकडे गेले नव्हते. ज्या प्रकारे देशमुख यांची हत्या झाली ते पाहून अशा घटना महाराष्ट्रात होत आहेत, यावर विश्वास बसत नाही. जे सिनेमात कधीकाळी पाहिजे, ते आज वास्तवात महाराष्ट्रमध्ये पाहायला मिळते आहे. आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल, याची मला फार भीती वाटते, मला कधीही भीती वाटली नाही, पण आजची परिस्थिती पाहून भीती वाटते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बीडच्या घटनेवर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. पोलिसांची केवळ बदली करून चालणार नाही. खरे म्हणजे घटनेमागचा मास्टरमाईंड कोण आहे हे शोधले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याला अपेक्षा आहेत. त्यांनी महाराष्ट्रला न्याय द्यावा, असे सांगतानाच धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.