बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेला आता एक महिना उलटून गेला आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली.
राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात येते होते. तो पुण्यात सीआयडीला शरण आला, तो सध्या सीआयडीच्या कोठडीमध्ये आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
हार्वेस्टर शेतकऱ्याकडून वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे एक मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. हार्वेस्टर मशिनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला प्रत्येक शेतकऱ्याने आठ लाख रुपये दिल्याचा आरोप अमर पालकर या शेतकऱ्यानं केला आहे.
सह्याद्री अतिथी गृहात कृषीमंत्री धनंजय मुंडेना भेटून ८ लाख रुपये देत असल्याची कल्पना देखील दिली होती, असा दावाही या शेतकऱ्याने केला आहे, त्यामुळे आता मंत्री धनंज मुंडे यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले अमर पालकर?
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , हार्वेस्टर मशिनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला प्रत्येक शेतकऱ्याने आठ लाख रुपये दिले. 14-9-2023 ला मुंबईत सह्याद्री अतिथी गृहामध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडेंना भेटून ८ लाख रुपये देत असल्याची कल्पना देखील दिली होती. त्यावर मुंडेंनी लवकरात लवकर अनुदान मिळवून देऊ, असंही सांगितलं होतं.
राज्यातील १४१ हार्वेस्टर मालकांनी प्रती हार्वेस्टर ८ लाख रुपये वाल्मिक कराडला दिले आहेत. परळी आणी पनवेल मध्ये पैसै दिले. नवी मुंबईतील पनवेल येथील देवीस रेसियडन्सीमधील १७ नंबर रुममध्ये वाल्मिक कराड, नामदेव सानप, व जितु पालवे या तिघांकडे पैसै दिले, असं अमर पालकर यांनी म्हटलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सानप हा कराडचा समर्थक आहे, तर जितु पालवे हा कराडचा नातेवाईक आहे. पैसै देऊनही अनुदान न मिळाल्याने विचारणा करायला गेल्यावर वाल्मीक कराडने शिविगाळ व मारहाण करुन आम्हाला माघारी पाठवले. या प्रकरणाची स्वत: अजित पवारांना ही कल्पना आहे, बारामती मधील मशिन मालक आहेत. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आहे. आमचे पैसै न मिळाल्यास मंत्रालयात सामुहीक आत्मदहन करणार, असा इशाराही या शेतकऱ्याकडून देण्यात आला आहे.