बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर असल्याची खळबजनक बाब समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे माझ्याकडे पुरावे असल्याचं म्हणत एका महिलेनं ठाण मांडलं होतं.
मात्र, पोलीस आल्यानंतर सदर महिला बसमध्ये बसून पसार झालीये. याप्रकरणी पोलीस सदर महिलेबाबत चौकशी करत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला ठाण मांडून बसली होती. कृष्णा आंधळेचे माझ्याकडं पुरावे आहेत असा दावा ही महिला करत होती. ही अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी 6 वाजता देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोरील पॅन्डॉलमध्ये दाखल झाली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला तीने केला. मात्र, पोलिस आल्यानंतर तीने नाव सांगण्यास देखील नकार दिला.
या महिलेने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशीही मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची आहे असा तिचा हट्ट होता. यानंतर ती देशमुखांचा घराच्या परिसरात बसुन राहिली. रात्रभर पॅंडॉलमध्ये झोपली अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसुन निघुन गेली.
ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तीची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे.