''मला पालकमंत्रिपद नको होतं...''  धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,  नक्की काय म्हणाले ?
''मला पालकमंत्रिपद नको होतं...'' धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तसेच, या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावरही  जोरदार टीका झाली. दरम्यान मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी  विरोधकांकडून केली जात होती. त्यामुळे बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडे असणार याबद्दल बरीच चर्चा रंगली होती. 

दरम्यान, महायुती सरकारने अखेरीस बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली असून धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रिपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असणार आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून अजितदादांचं अभिनंदन केलं आहे. पण, आपल्यालाच बीडचे पालकमंत्रिपद नको होतं, असा खुलासाच धनंजय मुंडेंनी केला आहे. 

बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो’ असा दावाच धनंजय मुंडेंनी केलं.

तसेच , सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल  मुख्यमंत्री आणि  उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील’ असंही धनंजय मुंडे म्हणाले,

तसंच, “बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे’ असं म्हणत अजितदादांचं अभिनंदनही केलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group