
२३ जानेवारी २०२५
बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. तुरुंगामध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
बुधवारी देखील वाल्मिक कराडची प्रकृती खराब झाली होती त्याला सर्दी, खोकला आणि ताप आला होता. वैद्यकीय तपासणीतून ही माहिती समोर आली होता. आता त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडली. पोटात दुखू लागल्याने वाल्मिक कराडला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात रात्री एक वाजता आणण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर उपचार करण्यात आले.
मात्र प्रकृती नाजूक असल्याने त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या बीड जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Copyright ©2025 Bhramar