सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस? असा जाब विचारत फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना घडल्यानंतर या प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप फरार झालेत .
दरम्यान, आरोपी वैद्यनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे .या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी कारवाई करणार असल्याचे सांगितलं आहे .आरोपीच्या शोधासाठी एक पथकही रवाना झाले आहे .
एकीकडे कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडत नाही. दुसरीकडे त्याचं समर्थन करत कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे याची दखल पोलीस प्रशासन नेमकी कशी घेते असा सवाल उपस्थित होत आहे.
नक्की प्रकरण काय?
बीडच्या धारूर येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संबंधित बातम्या पाहिल्याने तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली .जखमी तरुणावर सध्या अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून अशोक शंकर मोहिते असं या तरुणाच नाव आहे .आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहिल्याने कृष्णा आंधळेच्या दोन मित्रांनी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी या तरुणास जाब विचारत मारहाण केली . इथून पुढे मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी त्या तरुणास दिली .
वाढदिवसानिमित्त आरोपींनी ठेवले कृष्णा आंधळेचे स्टेटस
या तरुणाला मारहाण करून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत .दरम्यान,या दोन्ही आरोपींनी आपल्या मोबाईलवरून 'मिस यु भाई ' असं लिहीत कृष्ण आंधळे चा फोटो स्टेटस म्हणून ठेवला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस या दोघांनी काल ठेवल्यामुळे प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे . फरार आरोपी कृष्णा आंधळेला शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवल्याने या आरोपींवर गुन्हा दाखल होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .
एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 60 दिवस होत असताना आरोपी कृष्णा आंधळे पोलीस यंत्रणेला अजूनही सापडलेला नाही .दुसरीकडे कृष्णा आंधळे च्या समर्थन करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत .यामुळे पोलीस प्रशासन नेमकं करताय काय असा सवाल उपस्थित होतोय .