बीड पुन्हा हादरलं! झाडाखाली दगडाने ठेचून तरुणाची हत्या ; नेमकं प्रकरण काय?
बीड पुन्हा हादरलं! झाडाखाली दगडाने ठेचून तरुणाची हत्या ; नेमकं प्रकरण काय?
img
Dipali Ghadwaje
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारी घटनांचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी एक हत्या झाली आहे.

या हत्याप्रकरणाचा तपशील लक्ष वेधून घेणारा आहे. बीड जिल्ह्यातील शिरसाळा परिसरानजीक कान्हापूर गावात जुन्या वादातून स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची हत्या करण्यात आली. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते. 

बीडच्या धारुर तालुक्यातील कान्हापूर हे गाव शिरसाळाजवळ येते. येथील स्वप्नील उर्फ बबलू देशमुखचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

दोन वर्षांपूर्वी स्वप्निल देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुख यांनी मार्च 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी बबलू देशमुख  याच्यावर कलम 306, कलम 504, कलम 506, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल होता.

हा गुन्हा मागे घेण्यासाठीच बबलू देशमुख हा अविनाश देशमुख यांचा भाऊ संतोष देशमुख  यांच्यावर वारंवार दबाव  आणत होता. या त्रासाला कंटाळून संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी सोनाली देशमुख यांनी बबलू देशमुख याच्यावर हल्ला करुन त्याला संपवले.

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर आता शिरसाळ्यात हत्या करणाऱ्या व्यक्तीशी संतोष देशमुख यांचे नामसार्धम्य आढळून आल्याने याप्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या हल्ल्यात संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख हे दोघेही  गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीवर बबलू देशमुख याने वार केले आहेत.  पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेली  गुप्ती घटनास्थळावरुन जप्त केली आहे.

बबलूची हत्या केल्यानंतर संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख दोघेही स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांनी पोलिसांत स्वप्निल देशमुख विरोधात फिर्याद दाखल केली. विशेष म्हणजे ज्या झाडाला लटकून अविनाश देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली संतोष देशमुख यांनी बबलू देशमुख  याची हत्या केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group