बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात एक मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या चार महिन्यांच्या बाळाची क्रूर पद्धतीने हत्या केली आहे. त्याने पहाटे बाळाला आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारलं आहे. आरोपी वडील एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वत:ही गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे.

अधिक माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी घराघरात आनंद आणि उत्साह असताना बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे खळबळजनक घटना घडली.
यादिवशी तलवाडा येथील सोनवणे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आधी वडिलांनी आपल्या चार महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवलं. नंतर स्वत: गळ्यात फास लावून आयुष्य संपवलं.
अमोल हौसराव सोनवणे (वय वर्ष ३०) असे निर्दयी वडिलांचं नाव आहे. चार दिवसांपूर्वी अमोल आणि त्याची पत्नी पायल यांच्यात घरगुती वाद झाला होता. रागाच्या भरात दोघांनी विषारी औषध प्राशन केलं. उपचारानंतर दि. २ ऑक्टोबर रोजी दोघे घरी परतले. पण दुसऱ्याच दिवशी पहाटे अमोलने टोकाचे पाऊल उचलले.
नेमके कोणत्या कारणातून हे घडले, याचा तपास सुरू असून अद्याप कारण समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस स्टेशनचे स.पो.नि मनोज निलंगेकर, उपनिरीक्षक कैलास अनालदास, पो.ह शेख मोहसीन, पो.ह नारायण काकडे आणि चालक पो. पवन शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अमोल आणि त्याच्या बाळाचे शवविच्छेदन तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने तलवाडा परिसर शोकाकुल झाला आहे.