नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हृदयद्रावक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. दहावीमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या आई वडिलांच्या एकुलत्या एक मुलाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत टोकाचं पाऊल उचलल. शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

मृत विद्यार्थी पाथर्डी फाटा परिसरात पालकांसोबत राहत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत काम करत असून तो त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. काही आठवड्यांपूर्वीच त्याने गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळवत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दहावीमध्ये त्याने ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही काळाने त्याने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली.
गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट तपासासाठी महत्त्वाची ठरत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
काय होती शेवटची पोस्ट?
"हाय गाइज... तुम्ही मला शेवटचं ऐकत आहात. आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. माझ्या आयुष्यात आता कोणतंही ध्येय किंवा स्वप्न शिल्लक नाही. माझ्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो, पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगलो. शाळेपासूनच मी नैराश्य आणि मानसिक त्रासात होतो. आता मात्र तो टोकाला पोहोचला आहे.
माझ्या कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतकांचे मनापासून आभार. तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही, मीच पात्र नव्हतो. तुमचे सर्व प्रयत्न मी वाया घातल्याबद्दल क्षमस्व. सॉरी… साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ. गुड बाय...” असे विद्यार्थ्याने शेवटच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोस्टमध्ये व्यक्त केलेली भावना आणि उल्लेखांमधून त्याच्या मानसिक अवस्थेचा अंदाज घेत गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी विद्यार्थ्याच्या आत्महत्येने महाविद्यालय, परिसर आणि विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.