चंदीगडमध्ये सेक्टर-11 येथील घरात IPS पूरन कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी ९ पानी सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांनी ही सुसाईड नोट हस्तगत केली आहे. या सुसाईड नोट मध्ये धक्कादायक कारण समोर आले.

सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण समोर
पोलिसांना जी सुसाइड नोट मिळाली, त्यात पूरन कुमार यांनी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल सविस्तरपणे लिहिलय. “हरियाणामध्ये काही वरिष्ठ अधिकारी 2020 पासून माझ्याबरोबर जाती आधारित भेदभाव करत होते. मानसिक छळ, सार्वजनिक अपमान आणि अत्याचाराने मी त्रस्त आहे. माझ्यासाठी हे सर्व सहन करण्यापलीकडे गेलय” असं लिहिलय.
“माझ्या विरोधात अनेक प्रकारच्या तक्रारी पेरल्या जात असून प्रचार केला जात आहे. त्यावरुन वरिष्ठ अधिकारी सार्वजनिकरित्या मला अपमानित करतात. माझ्या प्रतिष्ठेच नुकसान करण्यात ते कुठलीही कमतरता ठेवत नाहीत” असं त्यांनी लिहिलय. आपल्या सुसाईड नोटमध्ये पूरन कुमार यांनी 15 सेवारत आणि माजी IAS-IPS अधिकाऱ्यांवर सार्वजनिक रित्या भेदभावाची वागणूक दिल्याचा आणि अपमानित केल्याचा गंभीर आरोप केलाय.
पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये आरोप केला की, त्यांचे बॅचमेट मनोज यादव, पी.के. अग्रवाल आणि टी.वी.एस.एन. प्रसाद यांनी मिळून जातीवरुन त्यांचा छळ केला. त्यांना लिहिलय की, या बद्दल मी तत्कालिन गृहमंत्र्याकडे तक्रार केली होती. पण कुठलही ठोस पाऊल उचललं नाही.
IPS पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत कुमार IAS अधिकारी आहेत. पूरन कुमार यांची पत्नी अमनीत यांनी डीजीपी हरियाणा शत्रुजीत सिंह कपूर आणि एसपी रोहतक नरेंद्र बिजारणिया यांच्यावर त्यांच्या पतीचा मानसिक छळ, जाती-आधारीत भेदभाव आणि त्रास दिल्याचा आरोप केला आहे. माझ्या पतीला जाती सूचक शिव्या दिल्या असाही अमनीत यांचा आरोप आहे. पोलीस या सर्व आरोपांची चौकशी करत आहेत.