नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पती व सावत्र मुलाच्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना श्रमिकनगर परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मिलन दीपक निकम यांचा विवाह श्रमिकनगर परिसरातील रहिवासी दीपक भीमराव निकम यांच्याशी झाला होता.
घर घेण्यासाठी मिलनने माहेरून पैसे आणावेत, यासाठी मिलनचा नवरा दीपक व तिचा सावत्र मुलगा गौतम यांनी तिला धमकावले होते, तसेच तिला मारहाण करून शिवीगाळ करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत मिलनने 2 मार्च 2025 रोजी दीपकने मारहाण केल्याचे फोनद्वारे फिर्यादीला सांगितले होते. त्याच दिवशी दीपक यांची मुलगी हिने फिर्यादी यांना सांगितले, की मम्मीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून, त्यांना ताबडतोब सिव्हिलला येण्याबाबत कळवले.
फिर्यादी या हॉस्पिटलला पोहोचल्या असता तेथून आरोपी दीपक हा पळून गेला होता. या प्रकरणी प्रथम फिर्यादी ताराबाई भालेराव यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी दीपक भीमराव निकम व गौतम दीपक निकम यांच्याविरुद्ध विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे करीत आहेत.