महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापूर पश्चिममध्ये घडली आहे. अवघ्या ३६ वर्षीय महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रावणी वारिंगे असे महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्टला श्रावणी या ड्युटीवरून रात्रीच्या सुमारास घरी परतल्या. घरी परतल्यानंतर त्यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. बदलापूर पश्चिमेतील वेदांत नक्षत्र या इमारतीतून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
वारिंगे यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादातून त्यांना नैराश्य आलं होतं. मानसिक तणावात त्या जगत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. याच नैराश्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या का केली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.