नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात कारणातून 14 वर्षीय मुलाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबड एमआयडीसी परिसरात घडली आहे.युवराज मंगल मगर (वय 14) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की 11 ऑगस्ट रोजी युवराज हा मित्रांसोबत पांडवलेणीजवळ सुरू असलेल्या जत्रेला गेला होता. तो तेथून आल्यानंतर घरच्यांनी त्याला जत्रेला येण्यासाठी आग्रह धरला; मात्र तो त्यांच्यासमवेत गेला नाही. घरचे सर्व जण जत्रेला गेल्यानंतर त्याने घरातील किचनमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घरचे जत्रेहून आल्यानंतर त्यांना प्रकार पाहून धक्काच बसला. त्यांनी त्वरित त्याला औषधोपचारासाठी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार झोले करीत आहेत.