महाराष्ट्रात प्रहार संघटनेकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सुरु असताना नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. काम मिळत नसल्याने एका कामगाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांची मंत्रालयात बैठक झाली होती.
त्यावेळी रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला ६० नोंदणी फॉर्म देण्याचे मान्य केले होते. मात्र, मंत्र्यांचे आदेशपत्र मिळून पाच वर्षे होऊनही प्रहार संघटनेच्या सदस्यांना कामगार उपायुक्तांनी न्याय दिला नाही. त्यामुळे नाशिक रोड मालधक्का येथे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय. याचेच पडसाद आज नाशिकमध्ये दिसून आले.
बच्चू कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला काम दिले जात नसल्याने, प्रहार कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद सोनकांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोनकांबळे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टाळला.
वेळोवेळी निवेदन देऊन, आंदोलन करूनही आम्हाला खोटी आश्वासन देण्यात आली. सदर कामाचे नियोजन कामगार उपायुक्तांनी करून दिले नाही, यामुळेच आज २४ जुलैला सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, असं सोनकांबळे म्हणालेत.