नाशिकमध्ये आत्महत्या सत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नाशिक शहरातील अंबड, तिडके कॉलनी व म्हसरूळ परिसरात चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
गळफास घेतल्याची पहिली घटना चुंचाळे शिवारात घडली. दत्तात्रय लालू राक्षे (वय 33, रा. आशीर्वाद हाईट्स, चुंचाळे शिवार, अंबड) यांनी दि. 25 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घराच्या हॉलमधील हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
हे ही वाचा
आत्महत्येची दुसरी घटना जाधव संकुलाजवळ घडली. सुनील फत्रू दंडगव्हाळ (वय 52, रा. ड्रीम सेक्टर, बी विंग,सातपूर-अंबड लिंक रोड,जाधव संकुलाजवळ, नाशिक) यांनी दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या बेडरूममध्ये पंख्याला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना त्यांचा मुलगा ईश्वर याच्या लक्षात येताच त्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
हे ही वाचा
आत्महत्येची तिसरी घटना चांडक सर्कल परिसरात घडली. अर्चना सोमनाथ धोंगडे (वय 30, रा. रेसिडेंट टॉवर नं. 1, चांडक सर्कल, तिडके कॉलनी, नाशिक) हिने दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बेडरूममध्ये एकटी असताना तिने फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तिला उपचारासाठी तिच्या दाजींनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार के. एन. गायकवाड करीत आहेत.
हे ही वाचा
आत्महत्येची चौथी घटना रासबिहारी लिंक रोडवर घडली. संकेता शंतनू जोशी (वय 31, रा. अमृतयोग अपार्टमेंट, श्रीपाद कॉलनी, रासबिहारी-मेरी लिंक रोड, नाशिक) हिने दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बेडरूममधील फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ती रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन मद्रूपकर करीत आहेत.
या चौघांनी आत्महत्या कोणत्या कारणांनी केल्या, हे मात्र समजू शकले नाही. यामुळे मात्र शहरात खळबळ उडाली आहे.