दैनिक भ्रमर : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. व्यसनाच्या सवयीमुळे एका आईने आपल्या ३ मुलांना जबरदस्तीने विष पाजलं त्यानंतर तिने देखील विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या यादव कुटुंबातील एका व्यक्तीच्या पत्नीला गुटखा खाण्याचे व्यसन होते. गुटखा खायला पैसे देत नाही यावरून झुमकी आणि तिचा नवरा बब्बू यादव यांच्यामध्ये वाद झाला. नवऱ्याने पैसे द्यायला नकार दिला. तिला नकार सहन झाला नाही, त्यामुळे महिला संतप्त झाली. तिने आपल्या २ वर्षे आणि ४ वर्षांच्या दोन मुली आणि ५ वर्षांच्या मुलाला आधी विष पाजलं. त्यानंतर ती देखील विष प्यायली.
या चौघांनाही उपचारासाठी मध्य प्रदेशातील सतना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. चौघांची देखील प्रकृती गंभीर होती. याचवेळी उपचारादरम्यान महिला आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मुलावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी सांगितले की, बब्बू यादवची बायको झुमकीला (३२ वर्षे) गुटखा खाण्याची सवयी होती. बब्बू तिला गुटखा खाऊ नको असे वारंवार सांगायचा यावरूनच त्यांच्यामध्ये भांडण देखील व्हायचे. शनिवारी झुमकीने नवऱ्याकडे गुटखा खाण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे दिले नाही. त्यानंतर तिने टोकचे पाऊल उचलत मुलांना विष पाजून स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.