इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (IB) कार्यरत असलेले २८ वर्षीय अविनाश कुमार आणि त्याची २५ वर्षीय बहीण अंजली यांनी गुरूवारी सायंकाळी विष पिऊन आत्महत्या केली होती. गाझियाबादमध्ये ही भयंकर घटना समोर आली. या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. या प्रकरणाला आता एक नवीन वळण आलं आहे. आपलं जीवन संपवण्यापूर्वी बहीण अंजलीने डायरीच्या 22 पानांवर ही सुसाईड नोट लिहिली होती. यात तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
अंजलीने लिहिले आहे की आमच्या मृत्यूला रितू (सावत्र आई) आणि सुखवीर सिंग (वडील) वगळता दुसरे कोणीही जबाबदार नाही. महिम (मित्र) माझ्या खात्यातील पैसे आणि पीएफचा मालक असेल आणि मिस रितू आणि सुखवीर सिंग यांनी माझ्या चितेला हात लावू नये. फक्त महिम मला मुखाग्नी देईल.
या सुसाईड नोटमध्ये अंजलीने लिहिले की, बाबा, एखाद्या मुलाला फक्त जन्म देणे आणि शाळेची फी भरणेच नाही तर त्याच्यासोबत वेळ घालवणे, त्याच्या इच्छा पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. माझ्या भावाला कठोर परिश्रम करून सरकारी नोकरी मिळाली. त्याचे इतके शोषण झाले आहे की तो त्याच्या मित्रांसोबत बाहेरही जाऊ शकत नाही. सुखवीर सिंग, मला तुम्हाला बाबा म्हणायलाही आवडत नाही. तुम्हाला माझ्या मृतदेहाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुमच्या स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा दाबला आहे. तुमच्या पत्नीचे अभिनंदन.
पुढे अंजलीने लिहिलं की, सावत्र आईने चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले, बदनामी केली, वडील मात्र गप्प राहिले, त्यांनी माझं ऐकलं नाही. काही लोक म्हणतील की मी वाईट आहे आणि मी माझ्या पालकांबद्दल अशा गोष्टी लिहित आहे. मला माहित आहे की मी माझ्या सावत्र आईसोबत 16 वर्षे कशी घालवली आहेत. माझ्या भावालाही त्याचे दुःख आहे.
पुढे अंजलीने लिहिलं की, मला तुमच्या फसवणुकीची आणि हुशारीची जाणीव आहे. म्हणून डायरीत लिहिलेली ही पाने फाडू नका. कारण मी त्यांचा फोटो काढून अनेक लोकांना पाठवला आहे. तुमची हुशारी पकडली जाईल. जर मी एकटीच मेली असती तर माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. आम्ही दोघेही भाऊ आणि बहीण मानसिक तणावाखाली आहोत. आता समाजात मान उंचावून जगून दाखवा.