राजधानी दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरुन खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित विद्यार्थी नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. तो मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी होता.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाया निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य पाटील हा त्यांचा मुलगा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीवनगर भागात भागात कुटुंबीयांसोबत राहत होता. शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे शौर्यने दीड पानाच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्यला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी जा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल. मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला.
शौर्यचे शेवटचे शब्द
'मेरा नाम शौर्य पाटील हैं. इस मोबाइल.... नंबर पर कॉल कर देना प्लीज. आय एम व्हेरी सॉरी. आय डीड धीस... पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंट्ने बहुत कुछ किया, आय एम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया... सॉरी भैय्या... सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं... स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू.'
या शब्दांमधून शौर्यवर झालेला मानसिक ताण किती गंभीर होता हे दिसून येते. कुटुंबीयांनी शिक्षिकांकडून झालेल्या वागणुकीमुळेच शौर्यने आपले प्राण दिल्याचा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांनी शाळेतील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक अत्यंत संतप्त झाले आहेत.