सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वर्षभरापूर्वीच घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेला खरं प्रेम केल्याची शिक्षा मिळाली आहे.

२६ डिसेंबर २०२४ रोजी ऋषिकेश गुरव व अमृताचा प्रेमविवाह झाला होता. साधारण एक वर्षापूर्वी घरच्यांचा विरोध डावलून अमृताने ऋषिकेश सोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर अमृता हि इश्वरपूर येथे पती ऋषिकेश, सासू- सासरे व ननंद यांच्यासोबत वास्तव्यास होती.
दरम्यान विवाहाला काही महिने उलटल्यानंतर सासरच्या मंडळींकडून अमृता हिचा छळ सुरु झाला होता. काही महिन्यात पती ऋषिकेश आणि सासर्यांचे लोक हे सासू अनुपमा यांच्या आजारपणासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत; यासाठी अमृता हिच्याकडे तगादा लावला होता. तिला मारहाण करून मानसिक छळ करीत होते.
पती ऋषिकेश हा मारहाण करत होता. तर सासू आणि नणंद वारंवार अपमान करत होते. तर मामा नंदकिशोर हा ऋषिकेश याला तू अमृताला सोडून दे तुझं आपल्या जातीतील मुलीशी लग्न लावून देतो म्हणून अमृताला मानसिक त्रास देत होता.
सततच्या त्रासाला कंटाळून अमृता हिने शुक्रवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर तिला इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार समजतात, अमृताच्या आई- वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. तिथे अमृताने घडलेला सर्व प्रकार आई- वडिलांना सांगितला.
तिची प्रकृती बिघडल्याने तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पती ऋषिकेश, सासू सासरे व ननंद यांच्यावर इश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.