सांगली: पुरोगामी नेते, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे खून प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. गेल्या दहा वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. मात्र निकाल लागण्यापूर्वीच समीर गायकवाडचा मृत्यू झाला आहे.
गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांची त्यांच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. सकाळच्या वेळेत घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चार दिवसांनी २० फेब्रुवारी २०१५ रोजी ते मरण पावले. या प्रकरणात १० संशयितांपैकी समीर गायकवाड हा एक होता.
समीर गायकवाड याचा संबंध सनातन संस्थेशी होता. या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाडला सांगलीतून अटक करण्यात आली होती. काही वर्षे तुरुंगात काढल्यानंतर तो सध्या न्यायालयीन जामिनावर बाहेर होता.
पानसरे हत्या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा आणि मुख्य संशयित मानल्या जाणाऱ्या गायकवाडच्या मृत्यूमुळे आता या प्रकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेत काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.