सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटातुन मोठी बातमी समोर आली आहे. येथील विठलापूर पंचायत समिती गणातून नुकतेच मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले तृतीयपंथी पंचायत समिती सदस्य दिलीप अण्णा हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अलीकडेच झालेल्या पंचायत समिती निवडकीत सदस्य म्हणून निवडून आल्याचा आनंद साजरा होत असतानाच काही दिवसांतच त्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या निवडणुकीत हेगडे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विठलापूर पंचायत समिती गणातून त्यांनी तब्बल 2311 मताधिक्याने मोठा विजय मिळवला होता. तृतीयपंथी समाजातील उमेदवार असल्याने त्यांचा हा विजय केवळ राजकीय नाही तर सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात होता. तृतीयपंथी म्हणून ज्या समाजाने आत्तापर्यंत आम्हाला लांब केलं, त्याच समाजाने या निवडणुकीत भरघोस मतदान करून विजयी केल्याचा भावना हेगडे यांनी व्यक्त केल्या होत्या.
दिलीप अण्णा हेगडे हे बी.ए. पदवीधर होते. ते आवळाई गावचे विद्यमान उपसरपंच देखील होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आटपाडी तालुक्यासह दिघंची जिल्हा परिषद गटात शोककळा पसरली. दिलीप अण्णा हेगडे यांच्या आकस्मिक निधनामुळे तृतीयपंथी समाजातील नेतृत्वाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.