"आम्हीही शेतकरीच...आम्हाला पण कुणबी प्रमाणपत्र द्या", आता "या" समाजाने केली मागणी
img
Dipali Ghadwaje
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच आहे. अशातच आता आमच्या नावावर शेती आहे. आम्ही पूर्वापर शेती करतो. त्यामुळे आम्हीदेखील कुणबीच आहोत. आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र द्या," अशी मागणी सकल लिंगायत मोर्चाने केली आहे. लिंगायत समाजाने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.  त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रासाठी लिंगायत समाजही आग्रही झाल्याने शासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान लिंगायत समाज कष्टकरी असून शेकडो वर्षांपासून शेती करत आहे. त्यामुळे आमचा समावेश इतर मागास प्रवर्गात करावा. लिंगायत समाजातील सर्वच समाजघटकांना इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेले नाही. मात्र ते पिढ्यानपिढ्या शेती करत असल्याने कुणबी प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांचा सरसकट समावेश कुणबी म्हणून इतर मागास प्रवर्गात करावा. शासनाच्या अभिलेखात तसा उल्लेख नसल्याने इतर मागास दाखले मिळत नाहीत.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. शासनातर्फे सध्या मराठा कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरू आहे. त्यावेळी लिंगायत कुणबी, कुणबी लिंगायत, कुणबी माळी, तेली कुणबी, कुंभार कुणबी, सुतार कुणबी, कोळी कुणबी, साळी कुणबी, लोहार कुणबी अशा नोंदीही सापडत आहेत. त्यामुळे हे सर्व समाजघटक कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि पर्यायाने इतर मागास प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांचा सरसकट समावेश इतर मागास प्रवर्गात करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

यावेळी लिंगायत समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मराठा समाजापाठोपाठ लिंगायत समाजानेही कुणबी प्रमाणपत्राची मागणी केल्यामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थित सरकार काय निर्णय घेतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group