सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात असलेल्या उमेदवाराच्या आईन विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या मागचे कारण समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.
सांगलीमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. एकीकडे सर्वजण प्रचारात व्यस्त असतानाच प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उमर गवंडी यांच्या आई मुमताज गवंडी यांनी विष घेतले. त्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.ही बाब समजताच त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर रुग्णालयात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.दोन्ही गट आमनेसामने आल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजकीय दबावातून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप होत आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दबाव टाकल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केला आहे. तर या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या उषाताई जाधव यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
तर दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश नाईक यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगत, कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे सांगलीतील महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे.