सोलापूरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. निर्मला ठोकळ यांनी दोन वेळा आमदारपद भूषवले आहे.
जेष्ठ नेत्या आणि काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे मंगळवारी (१६ सप्टेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील निराळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तोरणा बंगला या ठिकाणी आहे. सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
निर्मला ठोकळ यांनी दोन वेळा आमदारपद भूषवले आहे. काँग्रेस पक्षासह महिला चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात नगरसेविका म्हणून झाली. १९७२-७६ यादरम्यान निर्मला ठोकळ सोलापूर शहर दक्षिणमधून काँग्रेसपक्षातर्फे विधानसभेवर निवडून आल्या.
१९८२ मध्ये ॲड. बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा निर्मला ठोकळ या राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधान परिषदेवर गेल्या होत्या. त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था देखील आहेत.