मुंबई : काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक असणारे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर हैदराबाद येथईल किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या 64 व्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मागच्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण आजारी होते. बीपी कमी झाला, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आधी नांदेडच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
वसंत चव्हाण यांचं निधन
वसंत चव्हाण यांची प्रकृती मागच्या काही दिवसांपासून खालावली होती. 13 ऑगस्टपासून हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यांची अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्हा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.