राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे पक्षांतरेही वाऱ्याच्या वेगाने होत आहे. राजकीय नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. दरम्यान, आता परभणी जिल्ह्यातून काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचा शिलेदारच भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार काँग्रेसचे परभणी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी मुंबईत मंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत. वरपूडकर हे काँग्रेसचे जिल्हाप्रमुख असल्यामुळे परभणीत त्यांची चांगली ताकद आहे.गेल्या काही दिवसांपासून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच वरपूडकर यांनी बावनकुळे यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीनंतर आता त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहे. येणाऱ्या 24 तारखेला सुरेश वरपूडकर यांचा मुंबई येथे भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय.