राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष संपूर्ण बळ लावून तयारी करताना दिसत आहेत. लोकसभेला महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वाधिक 13 खासदार विजयी झाले. त्यामुळं आता काँग्रेसनंही विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची तयारी सुरू केलीय. जागावाटपासाठी मुंबईत महाविकास आघाडी नेत्यांची बुधवारी पहिली बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसनं 135 जागांचा प्रस्ताव दिलाय..
लोकसभेला काँग्रेसनं 17 जागा लढवल्या, त्यापैकी 13 जागांवर काँग्रेसचे खासदार विजयी झाले. भाजपपेक्षाही जास्त जागा जिंकत काँग्रेस नंबर 1 पक्ष बनला. त्यामुळं आता विधानसभेला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. जागा वाटपा बाबत प्रस्ताव दिले जातात. प्रस्ताव दिल्यानंतर चर्चा केली जाते मागे पुढे काही जागा होऊ शकतात.आम्ही 125 काय 135 जागांचाही प्रस्ताव देऊ शकतो मात्र चर्चेनंतर अंतिम केले जाईल असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
288 पैकी 135 जागांवर काँग्रेसनं दावा केला आहे. उरलेल्या 153 जागांपैकी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार? हा मोठा प्रश्नच आहे. विधानसभा निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत वादाचे फटाके वाजण्यास सुरूवात झालीय.. मविआनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. मुख्यमंत्री म्हणून स्वतःचा चेहरा पुढं यावा, असा त्यांचा खटाटोप आहे.
आता काँग्रेसनं थेट 135 जागांवर दावा ठोकून आपल्याच मित्रपक्षांची कोंडी केलीय.. काँग्रेस एवढ्या जागांसाठी आग्रही राहणार का? आणि तसं झाल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भूमिका काय असणार? याकडं आता सगळ्यांचं लक्ष असणाराय.. दुसरीकडे महुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे यावं यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही आहे.