आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. त्यामुळे पक्षांतरे जोरदार होत आहे. या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात अशी गर्दी पक्षांतरासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. आता काँग्रेसचे माजी आमदार उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याने काँग्रेसला खिंडार पडणार असल्याचे चित्र आहे.
आयुष्यभर पुरोगामी विचारधारा जपणारे माजी आमदार सुरेश वरपूडकर आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत. उद्या, मंगळवारी दुपारी मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.वर्षानुवर्ष वरपूडकर विरुद्ध बोर्डीकर असा संघर्ष परभणी जिल्ह्याने पाहिला असतानाच पक्षांतरानंतर दोघांचा मिलाप कसा होईल हे देखील पहावे लागणार आहे.
सुरेश वरपूडकर २०१९ मध्ये पाथरी येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. सुरेश वरपूडकर यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला कितपत फायदा होईल हे येणाऱ्या काळात कळेलच पण जिल्ह्यात महाविकास आघाडीची प्रचंड ताकद कमी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.