लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
या यादीत एकूण 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये जालौर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आसामच्या जोऱ्हाट लोकसभा मतदारसंघातून गौरव गोगई यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
मध्यप्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसल्याने यामध्ये एकाही महाराष्ट्राच्या उमेदवाराचा समावेश नाही.
काँग्रेसने जाहीर केलेल्या 43 उमेदवारांमध्ये 7 जनरल, 13 ओबीसी, 10 एससी, 9 एसटी आणि 1 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने राजस्थानच्या 25 जागांपैकी 10 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये बिकानेर येथून गोविंद मेघवाल, चुरु येथून राहुल कस्वा, झुंझुनू येथून बृजेंद्र ओला, अलवर येथून ललित यादव, भरतपूर येथून संजना जाटव. टोंक येथून हरीश मीणा, जोधपूर येथून करण सिंह उचियारडा, जालौर सिरोही येथून वैभव गहलोत, उदयपूर येथून ताराचंद मीणा, चितौड येथून उदयलाल आंजना यांचा समावेश आहे.
काँग्रेसने मध्यप्रदेशातील 10 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये छिंदवाडा येथून नकुलनाथ, भिंड येथून फूल सिंह बरैया, टीकमगढ येथून पंकच अहिरवार, सतना येथून सिद्धार्थ कुशवाह, सीधी येथून कमलेश्वर पटेल, मंडला येथून ओंकार सिंह मरकाम, देवास येथून राजेंद्र मालवीय, धार येथून राधेश्याम मुवेल, खरगोन येथून पोरलाल खरते, बैतूल येथून रामू टेकाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.