छत्रपती संभाजीनगर : 'लोकसभेला राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल, आत्ता नाव घेतले नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल,' असा खणखणीत इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
"पाच टप्प्यात निवडणूका आहेत. मी कुणालाही पाठिंबा दिला नाही, तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या. नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही अफवा पसरवत आहेत, आपण पाठिंबा देणार नाही, दिला नाही," असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा बांधवांना आवाहन "सर्वांनी विनंती आहे भावनिक होऊ नका. आपल्या लेकरांच्या बाजूला रहा, आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी रहा. आपल्या लेकरांना न्याय मिळेल त्याला मत द्या. जो मदत करेल त्याला मत द्या, आपल्याला दिलेला त्रास विसरू नका, हे पाया पडतील आणि पुन्हा विसरून जातील, मतांमधून आपली ताकद दाखवा," असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
दरम्यान "राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे आहे. पाच टप्प्यांतील निवडणुका मराठ्यांमुळेच घ्याव्या लागल्या, यालाच भिती म्हणतात, यातच आमचा विजय झाला. प्रत्येक मतदार संघात मोदी तीन-तीन सभा घेत आहेत. पहिले पत्रकारांशी बोलत नव्हते आता बोलत आहेत, असा टोला लगावत 4 तारखेला पुन्हा उपोषण करणार आहे, तिथे पुढची दिशा कळेल. सविस्तर प्लॅन 4 तारखेला करू, अशी माहितीही त्यांनी दिली.छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.