नाशिक - सकल मराठा समाजाच्या वतीने खा. सुप्रिया सुळे यांची मॅरेथॉन चौकामध्ये गाडी अडवून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मी सर्व खासदारांना याबाबतची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांची व पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करेल, असे आश्वासन दिले.
आज नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या रावसाहेब थोरात सभागृह येथील कार्यक्रमाला जात असताना रस्त्यातच त्यांचा गाड्या अडवून मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून तत्काळ त्याबाबत घोषणा करावी यासाठी आपली व आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा, मराठा समाजाला आता कुठल्याही राजकीय पक्षाने आश्वासन देण्याचा प्रयत्न करू नये जी काही भूमिका असेल ती स्पष्टपणे समाजाला सांगा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला लोकसभेमध्ये मराठा समाजाने भरभरून मत दिली.
आपले खासदार निवडून आणले त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपण मराठा समाजाच्या न्यायिक मागणीला पाठिंबा नव्हे तर त्याबाबत आवाज उठवून सत्ताधारी पक्षाला जाब विचारावा व आरक्षण देण्यासाठी भाग पाडावे या आशयाचे निवेदन दिले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना सांगितले की, दोन ते तीन दिवसात मी सर्व राज्यातील खासदारांना स्वतः पत्र लिहून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पाच दिवसांच्या आत भेट घेते तसेच राज्य सरकारची भूमिका काय आहे हे बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन मराठा आरक्षण 50% द्यावे यासाठी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. विरोधक म्हणून आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू असेही त्या म्हणाल्या.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, नानासाहेब बच्छाव, नवनाथ शिंदे, किरण डोके, सुभाष गायकर, सचिन पवार, योगेश कापसे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, संगीता सूर्यवंशी, रागिणी आहेर, भारत पिंगळे, संदीप फडोळ, चेतन शेवाळे उपस्थित होते.