१२ ऑगस्ट २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि. 13 रोजी नाशिकमध्ये तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या निमित्ताने आम जनतेच्या सोयीसाठी काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद राहील, तर अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाने नाशिककरांना जावे लागेल, तसेच मोर्चानिमित्त बाहेरगावाहून येणार्या आंदोलकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था विविध ठिकाणी करण्यात आली आहे.
हे मार्ग आहेत बंद
स्वामीनारायण चौकापासून ते कन्नमवार पूल, मिर्ची हॉटेल ते स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट ते दिंडोरी नाका मार्गे मालेगाव स्टॅण्ड, तसेच रविवार कारंजाहून सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल ते सी. बी. एस. या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही बाजूंनी सकाळी 8 वाजेपासून ते मोर्चा संपेपर्यंत प्रवेश बंदी राहील.
हे आहेत पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहने मिर्ची हॉटेल सिग्नलपासून अमृतधाम-तारवालानगर चौक-कृषी उत्पन्न बाजार समिती सिग्नल-पेठ रोड मार्गे जातील. धुळ्याकडून येणारी वाहने अमृतधाम मार्गे तारवालानगर चौक, बाजार समिती सिग्नल, पेठ रोड मार्गे शहरात येतील.
दिंडोरी नाक्याकडून शहरात येणारी वाहतूक ही पेठ नाका, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल या मार्गे जाईल. तर दिंडोरी नाक्यावरून बाहेर जाणारी वाहने दिंडोरी नाका-तारवालानगर चौक-हिरावाडी मार्गे बाहेर पडतील. द्वारका सर्कलकडून कन्नमवार पुलाखालून जाणारी वाहतूक ही द्वारका उड्डाणपुलावरून पुढे जाईल.
विविध ठिकाणी पार्किंगची सोय
मोर्चानिमित्त नाशिकमध्ये येणार्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार संभाजीनगरकडून येणारी वाहने निलगिरी बाग, तपोवन येथे थांबतील. पेठ रोड व दिंडोरी रोडकडून येणारी वाहने आर. टी. ओ. जवळ शरद पवार मार्केट यार्ड, पेठ रोड येथे थांबतील.
घोटी, इगतपुरी व मुंबईकडून येणारी वाहने महामार्ग बस स्थानकाशेजारील मोकळ्या जागेत पार्क होतील. त्र्यंबक रोडकडून येणारी वाहने गोल्फ क्लब मैदानावर थांबतील. गंगापूर गावाकडून येणारी वाहने डोंगरे वसतिगृह मैदान व मविप्र कॉलेजमध्ये पार्क होतील. मोर्चामध्ये 30 ते 35 हजार किंवा त्याहून अधिक मराठा बांधव सहभागी होतील, असा अंदाज आहे.
त्यामुळे वाहतुकीच्या मार्गातील बदल लक्षात घेऊन शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व वाहनधारकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहनधारकांना केले आहे.
Copyright ©2024 Bhramar