नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जुने नाशिक परिसरातील चौक मंडईमधील बूथ क्रमांक 40 मध्ये बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून भाजपा आणि ठाकरे गट शिवसेनेमधील नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. अखेर यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि नंतर हा वाद शमला.
आज नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडई येथील बूथ क्रमांक 40 मध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर तातडीने भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे व इतर कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मतदारांना ओळखपत्र विचारून आतमध्ये सोडण्यास सुरुवात केली.
या विषयावरून या ठिकाणी ठाकरे गटाचे उपस्थित नेते माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अतिशय सुरळीत सुरू असलेल्या या मतदानाला अडवू नका, अशी मागणी ठाकरे गटाचे पदाधिकारी आमदार फरांदे यांच्याकडे करत होते. यामुळे भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील वाद हा वाढत गेला. अखेर या ठिकाणी पोलिसांनी काही हस्तक्षेप करून हा वाद मिटविला.