काँग्रेसला मोठा धक्का! लोकसभेच्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र झालं रद्द
काँग्रेसला मोठा धक्का! लोकसभेच्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र झालं रद्द
img
Dipali Ghadwaje
नागपूर : ऐन निवडणुकीच्या हंगामात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या संपूर्ण रामटेक  मतदारसंघात जोमात प्रचार करत असताना दुसरीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.  जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय समोर आल्याने आता बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे. 

 रश्मी बर्वे या काँग्रेसच्या रामटेक या मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार आहेत. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. मात्र ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा समोर आला. 

जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला होता. सुनिल साळवे नावाच्या व्यक्तीने याबाबतची तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता. 

जात पडताळणी समितीची नोटीस 
सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळ राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीने दिला आहे. या एका निर्णयामुळे बर्वे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group