दैनिक भ्रमर : मतचोरीच्या मुद्द्यावरुन सध्या देशातील राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीतील कथित ‘मतचोरी’च्या आरोपावरून ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीत जोरदार निदर्शने केली. ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसद भवन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. यामध्ये काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.
निवडणूक आयोगाने भाजपसोबत संगनमत करून मतदार याद्यांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप ‘इंडिया’ आघाडीने केला. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले आहे. मात्र, या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीतील खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला. यादरम्यान, अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मोर्चा रोखण्यासाठी जागोजागी बॅरिकेडिंग लावली गेली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले. मात्र, अनेक खासदारांनी बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न केला. सपा प्रमुख अखिलेश यादव तर बॅरिकेडवरुन उडी मारून दुसऱ्या बाजुला पोहोचले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:०० वाजता चर्चेसाठी वेळ दिला होता.
जागेअभावी जास्तीत जास्त ३० जणांची नावे कळवावीत अशी विनंती आयोगाने केली होती. मात्र, सर्व विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यावर ठाम होते. पोलिसांनी खासदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही ऐकायला तयार नव्हते. अखेर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इतर अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
तब्बल दहा वर्षानंतर संसदेच्या प्रांगणात खासदारांचा एल्गार पाहायला मिळाला. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत खासदारांनी मोर्चाचं आयोजन केलं. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी जागेवरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोरजोरात घोषणा देत असतानाच एका महिला खासदाराची प्रकृती बिघडली. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं. मात्र, त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व खासदारांना पुन्हा एकदा संसदेत नेऊन सोडलं.