लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलायला उभे राहिले आणि सभागृहात गोंधळ उडाला. राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्रातील एक संदर्भ दिला. या उल्लेखात डोकलाम आणि चीनचा संदर्भ असल्याने सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आला.
राहुल गांधी म्हणाले, "डोकलाममध्ये चिनी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले होते. मी एका मासिकाच्या लेखाचा उल्लेख करत आहे ज्यामध्ये माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे आत्मचरित्र उद्धृत केले आहे." राहुल म्हणाले, "मी जे वाचत आहे ते तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक ऐका; त्यावरून कोण देशभक्त आहे आणि कोण नाही हे स्पष्ट होईल. डोकलाममध्ये चार चिनी रणगाडे भारतीय हद्दीत घुसत होते. ते फक्त 100 मीटर अंतरावर होते."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना अडवले, त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहात पुस्तक ठेवण्याचा आग्रह धरला. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 2019 ते 2022 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम केले. राहुल गांधींच्या भाषणामुळे 46 मिनिटे गोंधळ उडाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उभे राहिले. त्यांनी स्पष्टपणे विचारले की, ज्या पुस्तकाचा उल्लेख केला जात आहे ते पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही, हे आधी सांगावे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राहुल गांधींना नियमांची आठवण करून दिली आणि “ऑथेंटिक पुरावा असेल तरच सदनात मांडावा,” असे सांगितले.
राहुल गांधींनी मात्र हे सर्व शंभर टक्के खरे असून, नरवणे यांच्या पुस्तकात पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांचा थेट उल्लेख असल्याचा दावा केला. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप करत सांगितले की, हा उल्लेख कोणत्याही प्रकाशित पुस्तकाचा नाही, तर एका मॅगझिनमधील लेखाचा आहे. “मॅगझिन काहीही छापू शकते. नरवणे यांनी असे विधान केल्याचे आम्हाला माहीत नाही,” असे अमित शाह म्हणाले.
सभापती ओम बिर्ला यांनी देखील भाषण करताना राहुल गांधींना अडवले आणि नियमांचा उल्लेख केला. राजनाथ सिंह, अमित शाह, रिजिजू आणि निशिकांत दुबे हे देखील त्यांना विरोध करताना दिसले. नरवणे यांचे आत्मचरित्र, "फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी," प्रकाशित झालेलं नाही. माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांचे आत्मचरित्र, "फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी," लिहिले गेलं आहे. पेंग्विन पब्लिकेशन्स ते प्रकाशित करणार आहे. तथापि, ते अद्याप प्रकाशित झालेले नाही.