मोठी बातमी : नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज
मोठी बातमी : नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज
img
Dipali Ghadwaje
केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 18 सप्टेंबरपासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत होणार आहे.  दुसऱ्या दिवशी म्हणजे 19  सप्टेंबरपासून  नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19  सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे.
 
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तारखा जेव्हा जाहीर झाल्या, तेव्हा हे अधिवेशन गणेशोत्सवाच्या काळात का होतंय यावरुन खासदारांनी टीका केली होती. त्यातही महाराष्ट्रातल्या खासदारांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे हा सवाल उपस्थित होत होता. 

संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन 28 मे रोजी करण्यात आलं होतं. मोदी सरकारच्या वर्धापन दिनाच्या आसपासच हा मुहूर्त निवडला गेला होता.पण त्यानंतर संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाज मात्र जुन्याच इमारतीतून झालं होतं. 

उद्घाटनाच्या वेळीही सेनगोल पूजा करुन धार्मिक प्रतिकांचं महत्व मोदींनी अधोरेखित केलं होतंच. गणपती ही बुद्धीची देवता आहे. हिंदू संस्कृतीमध्ये  कोणत्याही चांगल्या कामाचा श्रीगणेशा हा गणपतीचे स्मरण करुन केले जाते. याच पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीचा मुहूर्त हा नव्या संसदेच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी निवडण्यात आला आहे.  

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. पण अधिवेशन कशासाठी हे गुलदस्त्यात असल्याने विरोधक केंद्र सरकारवर प्रचंड नाराज आहेत. तर एक देश एक निवडणूक यासह 10 विधेयक मांडले जाण्याची चर्चा होतेय.  विशेष अधिवेशात भाजपच्या सर्व खासदारांनी आपली कामं रद्द केल्याची माहिती मिळत आहे. 

तसेच अधिवेशन काळात केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी, सचिव, कॅबिनेट सचिव यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एकापाठोपाठ वेगाने घडणाऱ्या घटना पाहून नेमके अधिवेशन काळात काय घडणार याची उत्सुकता वाढत चालली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group