नवी दिल्ली : संसदेच्या सोमवारपासून (ता.२२) सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्री य लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अधिवेशनात अर्थसंकल्पाव्यतिरिक्त विमान वाहतूक क्षेत्रातील सुविधांचा विस्तार करण्यासाठी भारतीय वायुयान विधेयक २०२४ या विधेयकांसह सहा नवीन विधेयके मांडण्यास सरकारचे प्राधान्य असेल.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या तांत्रिकदृष्ट्या पहिल्या अधिवेशनामध्ये नव्या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी (ता.२३) मांडतील. तत्पूर्वी, देशाच्या अर्थव्यवस्थेचे वस्तुनिष्ठ चित्रण मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (२२ जुलैला) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात येणार आहे.
याआधी झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये केवळ राष्ट्रपती अभिभाषण आणि नव्या खासदारांचा शपथविधी झाला होता. पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा असलेले वित्त विधेयक संमत करण्यात येईल. त्यासोबतच, अन्य काही नवी विधेयके देखील मांडण्यात येणार आहेत. यामध्ये विमान वाहतूक क्षेत्राशी निगडीत ९० वर्षांपूर्वीच्या कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक मांडले जाणार आहे.
विमान वाहतूक क्षेत्रातील व्यवसायाला चालना देणाऱ्या तरतुदींचा दीं या प्रस्तावित विधेयकामध्ये समावेश असेल. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक मांडण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या भूमिकेत अधिक स्पष्टता आणि समन्वय साधण्यासाठी हे विधेयक आणले जाणार आहे. या व्यतिरिक्त बॉयलर विधेयक, कॉफी तसेच रबर या उत्पादनांच्या प्रोत्साहन व विकासासाठीची देखील विधेयके मांडली जातील.