नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या चर्चा सुरुच आहे. संसदेत हिवाळी अधिवेशन देखील सुरु झालं आहे. यादरम्यानही या अधिवेशनात दोन्ही निवडणुकीच्या चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे विरोधी पक्ष संसदेत वक्फ बिल आणि अदानींच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी करताना दिसत आहे. दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संसद अधिवेशनच्या सत्राच्या पहिल्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'जनतेने विरोधकांना अनेकदा नाकारलं आहे. त्यांना संसदेत चर्चा करण्याचा अधिकार नाही. संसदेत चांगल्या प्रकारे चर्चा झाली पाहिजे. मात्र, काही लोक स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी संसदेतील वातावरणाव नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करतात. संसदेतील कामातही ढवळाढवळ करतात, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'जनतेने त्यांना ८०-९० वेळा नाकारलं आहे. जनतेने त्यांना नकार दिला आहे. ते संसदेत चर्चा होऊ देत नाही. विरोधकांमधील काही लोक संसदेतील कामकाजात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. देशातील जनता त्यांची वर्तवणूक पाहते. त्यानंतर त्यांना शिक्षा देते. काही लोक नव्या खासदारांना बोलण्याची संधी देत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणंही मांडण्यास मिळत नाही'.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशन आज म्हणजे २५ नोव्हेंबरपासून सुरु झालं आहे. संसदेचं अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.