एक घोषणा आणि ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका ; भारतावर काय होणार परिणाम , कोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक झटका बसणार? वाचा सविस्तर
एक घोषणा आणि ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका ; भारतावर काय होणार परिणाम , कोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक झटका बसणार? वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशातून आयात होणाऱ्या सामानावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्याला डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफच नाव दिलं आहे. “हा मुक्ती दिवस आहे. अमेरिकेला दीर्घकाळापासून या दिवसाची प्रतिक्षा होती” असं ट्रम्प रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा करताना म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावताना भारताला सुद्धा झटका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के टॅरिफ लावला आहे.  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २६ टक्के कर लावण्याची घोषणा केली. भारत अमेरिकेवर ५२ टक्क्यांपर्यंत शुल्क लादतो, त्यामुळे अमेरिका भारतावर २६ टक्के शुल्क लादणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. सर्व आयात केलेल्या उत्पादनांवर १० टक्के शुल्क लादणार असून ६० देशांवर अतिरिक्त कर लादणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर परस्पर शुल्क लादल्यानं कृषी, केमिकल्स, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणं, इलेक्ट्रिकल आणि मशिनरी सह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील वस्तूंवर परिणाम होऊ शकतो.

ट्रम्प यांनी आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा सुद्धा उल्लेख केला. अमेरिकेने भारतावर 26 टक्के डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच अमेरिकेत आले होते. ते माझे चांगले मित्र आहेत. या दौऱ्याच्यावेळी मी पंतप्रधान मोदींना बोललो, तुमचा आमच्यासोबतच व्यवहार योग्य नाहीय. भारत अमेरिकेकडून 52 टक्के टॅरिफ वसूल करतो. म्हणून आम्ही त्यांच्यावर निम्मा 26 टक्के कर लावणार आहोत”. 

अमेरिकेच्या डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. एक्सपर्ट्सनुसार काही भारतीय उत्पादनांना उच्च आयात शुल्काचा सामना करावा लागू शकतो.

SBI च्या एका रिपोर्टनुसार, भारताच या टॅरिफमुळे मोठं नुकसान होणार नाही. भारताच्या निर्यातीत 3 ते 3.5 टक्के घसरण होऊ शकते. निर्माण आणि सेवा क्षेत्रातील वाढत्या निर्यातीमुळे हा प्रभाव कमी होईल. यूरोप-मध्य पूर्व-अमेरिकेच्या माध्यमातून नवीन व्यापार मार्ग सुरु केले जात आहेत.

डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफच्या घोषणेआधी पहिले वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल या महिन्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टन येथे गेले होते. तिथे त्यांनी द्विपक्षीय व्यापार करारावर (बीटीए) चर्चा केली. तिथे या शुल्कांमधून सूट मागण्यात आली होती.

भारतातल्या कुठल्या उद्योगांवर होणार परिणाम?

एक्सपर्ट्सनुसार, टॅरिफचा सर्वात वाईट परिणाम कपडा उद्योग आणि ज्वेलरी सेक्टरवर होऊ शकतो. 2023-24 मध्ये भारतातून जवळपास 36 अब्ज डॉलर (जवळपास 3 लाख कोटी रुपये) कपडा निर्यात करण्यात आला. यात अमेरिकेचा वाटा 28 टक्के होता. म्हणजे 10 अब्ज डॉलर (जवळपास 86,600 कोटी रुपये). प्रत्येकवर्षी या क्षेत्रात भारताचा अमेरिकेसोबत व्यापार वाढत गेला आहे. 2016-17 आणि 2017-18 साली भारतातून अमेरिकेत 21 टक्के कपडा निर्यात झाली. 2019-20 मध्ये 25 टक्के आणि 2022-23 मध्ये 29 टक्के कपडा निर्यातीत वाढ झाली. दोन्ही देशांनी वर्षाअखेरीस व्यापार करार करण्याच लक्ष्य ठेवलं आहे. 2030 पर्यंत 500 बिलियन अमेरिकी डॉलरच द्विपक्षीय व्यापाराच लॉन्ग टर्म लक्ष्य ठेवलं आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group