राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात भारतातील सामाजिक आणि राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. भारतात अजूनही वंचित गटाला मुख्य सामाजिक प्रवाहात स्थान नाही. भारतात अशी समानता येईल त्यावेळी आरक्षण रद्द करण्याचा विचार करु असे वक्तव्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या व्याख्यानात केले आहे.
दरम्यान , लोकसभा निवडणुकीत संविधानाची प्रत दाखवून राहुल गांधी, मोदींवर आरक्षण संपवतील असा आरोप करत होते. राहुल गांधींच्या या धुवांधार प्रचाराचा काँग्रेसला फायदाही झाला, पण आता आरक्षण संपवण्याच्या वक्तव्यावरुन आता राहुल गांधींवर शिंदे फडणवीसही तुटून पडले आहेत. आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. मतांसाठी आरक्षणावरुन कसा खोटा नॅरेटिव्ह केला हे राहुल गांधींच्या वक्तव्यातून दिसलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.मात्र आता राहुल गांधी यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे .
राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन डीसीमधून स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, माझे विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, मी आरक्षणाच्या विरोधात नाही. सर्वांच्या सहभागासाठी आम्ही राजकारण करत आहोत.
दरम्यान , राहुल गांधी यांनी पीएम मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की 2014 पासून भारताचे राजकीय चित्र बदलले आहे. राहुल गांधी म्हणाले की, 2014 पासून भारताने एका नव्या राजकीय युगात प्रवेश केला आहे. त्यांच्या मते हा टप्पा आक्रमकतेने आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारा आहे. राहुल गांधी यांनी ही लढत चुरशीची असल्याचेही म्हटले आहे.