"आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे बघतोय"; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया
img
Dipali Ghadwaje
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे  आणि उद्धव ठाकरे  एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला जातो. राज्याच्या राजकारणात विशेषतः मुंबईच्या राजकीय वर्तुळात असंख्यवेळा विचारल्या गेलेल्या प्रश्नाला आज पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे.

मात्र यावेळी मुद्दा थोडा अधिक गंभीर आहे. याचं कारण असं की, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी स्वतः आपल्यातील (उद्धव ठाकरेंसोबत) वाद, भांडणं, छोटी असल्याचं सांगत एकत्र येणं, राहणं कठीण नाही, असं थेट म्हटलं आहे. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. 

राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांआधी उद्धव ठाकरेंसमोर केलेला हा मैत्रीचा हात समजला जातोय. आता याला उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता होतीच.

मात्र मुलाखत प्रदर्षित झाल्यावर उद्धव ठाकरेंनीही अगदी काही वेळात याला प्रतिसाद दिला. आपल्याकडून काही भांडणं नव्हती. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत असं उद्धव ठाकरेंनी मुंबईत जाहीर कार्यक्रमात म्हटलं.

मात्र महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्याचं आगतस्वागत करणार नाही हे ठरवा, आपल्यासोबत येऊन महाराष्ट्राचं हित आहे की भाजपसोबत जाऊन ते ठरवा अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली.

त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे बघतोय- संजय राऊत 

दोघेही भाऊ आहेत. काही राजकीय मतभेद झाले असतील.  राज ठाकरेंचं वक्तव्य आणि मी उद्धव ठाकरेंचंही भाषण ऐकलं.  महाराष्ट्र हितासाठी मी वाद मिटवायला तयार आहे, असं ते म्हणालेत. लोकसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते. वाद भांडण नाही आणि मिटवायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रच्या मुळावर येणाऱ्या या फौजा आहेत. आम्ही वेट अॅन्ड वॉचच्या भुमिकेत आहोत. आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे बघतोय, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील शूत्रंना मदत होईल अशी भूमिका घेऊ नये, असं आम्ही सांगितलं होतं. हे योग्य नाही महाराष्ट्राला परवडणारे नाही, ही भूमिका आजही आमची आहे. महाराष्ट्राचे शत्रू आमचे शत्रू अशी भूमिका कोणी घेत असेल तर आमचे स्वागत आहे.  सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, बोलतात वेगळं आणि करतात वेगळं...अशांना आम्ही थारा देणार नाही, हा विचार राज ठाकरेंनी करणं गरजेचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.  साद प्रतिसादाची भूमिका घेतली असेल तर सकारात्मक भूमिकेतून आम्ही पाहात आहोत. राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं. आजही अशी शक्ती आहे की, मराठी माणसाचे नुकसान व्हावे...महाराष्ट्राला पाण्यात पाहात आहेत...अशांना आम्ही घरात घेणार नाही, असंही संजय राऊतांनी सांगितले. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group