नाशिकमधील एका तरुणावरती झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर आता संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसेच संबंधित तरुणाला पाठिंबा देत त्याच्यावर दाखल गुन्हा हा खोटा असून भाजप आणि पोलिसांकडून तरुणाला अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. नाशिकमधील कृष्णा डोंगरे या व्यक्तीच्या नावावरती नाशिकमध्ये बलात्कारासारख्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. या प्रकरणात राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे, त्याचबरोबर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकच्या पोलिसांवर आणि देवेंद्र फडणवीसांवर गंभीर दावे केले आहेत. त्याचबरोबर राऊतांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे, मुख्यमंत्री कृष्णा डोंगरे या शेतकरी बांधवाचे प्रकरण गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करतो म्हणून मंत्री व नाशिक पोलीस यांनी बलात्कारासारख्या गुन्हात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रात आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा गुन्हा आहे का? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.
आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे आणि मकोका दाखल केला. त्यांच्या कुटुंबाची समाज माध्यमावर बदनामी करतो म्हणून जाब विचारायला गेले तर त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डर असे गुन्हे दाखल केले. भाजपमध्ये जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारल्यावर ते गुन्हे पोलीस मागे घेतात किंवा थांबवतात. ते गुन्हे मागे घेतले जातात. या पोलिसांना वर्दी घालून मिरवण्याची लाज वाटली पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले. डोंगरेवर खोटा गुन्हा दाखल करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांचा हात आहे, कोणत्या मंत्र्याच्या दबावाखाली तुम्ही बलात्काराचे गुन्हे दाखल करता? कृष्णा डोंगरे हा कांदा प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत होता, तुम्हाला आठवत असेल त्याने आपल्या कांद्याचा शेत जाळलं होतं, त्यांनी अग्निकांड केलं, भाव मिळत नाही म्हणून त्यांनी स्वतःचा शेत जाळलं असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.
कृष्णा डोंगरे याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवत आहात, त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. जो आमच्या विरोधात आवाज उठवेल त्याला अटेम्प्ट टू मर्डर बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात टाकू हा इशारा पोलीस देत आहेत, पोलीस कोणाचं काम करत आहेत? ते जनतेचे सेवक आहेत की भाजपचे सेवक आहेत? हे एकदा आम्हाला समजू द्या त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने सर्व पाहू, असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे. तसेच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिले आहे.