अमोल किर्तीकरांच्या निकालावर संजय राऊतांची महिला अधिकाऱ्यांवर जोरदार टीका
अमोल किर्तीकरांच्या निकालावर संजय राऊतांची महिला अधिकाऱ्यांवर जोरदार टीका
img
दैनिक भ्रमर
मुंबई : लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर अवघ्या ४८ मतांनी हरले. सुरुवातीला त्यांनाच विजयी करण्यात आलं होतं. परंतु, फेर मतमोजणी झाल्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं. यावरून ठाकरे गटाने चौकशीची मागणी केली असून याप्रकरणी ते न्यायालयातही जाणार आहेत. याबाबत संजय राऊतांनी रिटर्निंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आठवड्याभरापासून सीसीटीव्ही फुटेज मागितले जात आहेत, परंतु, फुटेज दिले जात नाहीत, याबाबत पत्रकारांनी आज संजय राऊतांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, “जो चोर असतो तो सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा नष्ट करतो. रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी या महाराष्ट्रातील सर्वांत भ्रष्टचारी अधिकारी आहेत. त्यांचा इतिहास पाहा. सर्वांत भ्रष्टाचारी अधिकारी जर कोणी असतील तर वंदना सूर्यवंशी आहेत. त्यांनीच अमोल कीर्तिकरांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली दिला आहे. या प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत.

“चार महिन्यांत परिवर्तन होणार आहे. तेव्हा या वंदना सूर्यवंशी कुठे जाणार? सीसीटीव्ही फुटेज मिळणार नाहीत, वायकरांचे लोक फोन घेऊन फिरत होते. ही कोणाची जबाबदारी होती? सीसीटीव्ही फुटेज तिथे मिळत नाहीत तर हा सर्व प्रकार वंदना सूर्यवंशीने केला आहे. मी लवकरच त्यांना एक्स्पोज करणार आहे”, असा इशाराही त्यांनी दिला.

“एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री, गुलामी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी त्यांना हा निकाल पचणार नाही. ही चोरी पचणार नाही. त्यांना जुलाब होणार आहेत. वंदना सूर्यवंशींचा प्रशासकीय इतिहास वादग्रस्त आहे. कोणाच्या दबावाखाली काय काम केलंय. कशा चोरा माऱ्या एमएमआरडीएपासून महसूल विभागापर्यंत हे सर्व सांगणार. सीसीटीव्ही फुटेज मिळत नाहीत ही त्यांची जबाबदारी आहे. रवींद्र वायकरांचे नातेवाई आणि मित्रपरिवार मोबाईल घेऊन फिरत होते, त्यांनी का रोखलं नाही? त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.

“आरएसएसमध्ये असलेले गडकरी गप्प बसले आहेत. राजनाथ सिंहही आरएसएशी संबंधित आहेत. देशात दोन हुकुमशाहा भ्रष्टाचाराला वाव देत आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले. मोहन भागवतांनी मणिपूर प्रकरणावरून नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “मोहन भागवतही मणिूपमध्ये गेले नाहीत, काश्मीरमध्येही गेले नाहीत. मोदी, शाह आणि इस्ट इंडिया कंपनीचे लोक जात नाही, तर तुम्ही जा. आम्ही तुमच्याबरोबर येऊ. तुम्ही नेतृत्त्व करा देशहितासाठी आम्ही येऊ बरोबर. बाते करून काही होणार नाही”, असंही ते म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group