मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर, वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा,
मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर, वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा, "हा" आहे आरोप
img
Dipali Ghadwaje

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी होत खासदार झाले. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित केल्यावर फेरमतमोजणीनंतर वायकर जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. याविरोधात ठाकरे गटाने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेतच.

मात्र मतमोजणी दिवशी वायकरांचे मेहुणे मतमोजणी केंद्रावर परवानगीविना मोबाईलचा वापर करत असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीच्या दिवशी उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर हे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत होते, असा आरोप आहे.

मतमोजणी केंद्रातील खोलीत परवानगी नसतानाही मोबाईलचा वापर केल्याची तक्रार वनराई पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केली होती. एका  वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, शाहांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता, तहसीलदारांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि भरत शाहांना साक्षीदार बनवलं, याशिवाय एफआयआरची कॉपी देण्यासही नकार दिला, असा आरोप भरत शाह यांनी केला आहे. 

दरम्यान हे प्रकरण दाबण्याचा आणि गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अखेरच्या फेरीनंतर नाट्यमय घडामोडी घडल्या व त्यात शिवसेनेचे रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group