देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात!  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा ; वाचा सविस्तर
देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा ; वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या निकालात देशात एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र, अब की बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 240 जागांवरच समाधान मानावे लागले. तर, इंडिया आघाडीनेही 230 पर्यंतचं संख्याबळ गाठलं आहे. त्यामुळे, मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा देशात एनडीए आघाडीच्या  सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला मोठा पराभव पत्कारावा लागल्याने महायुतीचे सर्वच नेते निराश असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन, लोकसभा निवडणुकांतील पराभव मान्य करतो, या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, असे म्हटले. त्यानंतर, फडणवीस आज संघाची राजधानी आणि त्यांचं होम टाऊन असलेल्या नागपुरात दाखल झाले आहेत. 

नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. महायुतीच्या पराभवानंतर फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी, आपण उपमुख्यमंत्री पदावरुन मुक्त होण्याची विनंती आपण वरिष्ठ नेतृत्वाकडे करणार आहे.

आगामी काळात मला पक्षासाठी पूर्णवेळ काम करायचं आहे. त्यामुळे, सत्तेच्या जबाबदारीतून मला मोकळं करावं, असेही फडणवीस यांनी म्हटले. त्यानंतर, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांस सर्वांनीच फडणवीसांच्या या मागणीला विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहूनच पक्षाचं काम केलं पाहिजे, असेही म्हटले. तर, महायुतीमधील घटक पक्षांनीही फडणवीस हे सत्तेत असले पाहिजे, अशीच भूमिका घेतली. मात्र, फडणवीस आपल्या निर्णयावर अद्याप तरी ठाम असून आज ते नागपुरात पोहोचले आहेत. 

नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला असून स्वगृही त्यांच्या स्वागताला विमानतळावरच मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागपुरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा झाली. फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी सुमारे 2 तास ही चर्चा झाल्याची माहिती आहे. आज सकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट आपल्या धरमपेठेतील निवासस्थानी गेले होते. नागपुरात संघ शिक्षा वर्ग सुरु असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व प्रमुख अधिकारी सध्या नागपुरात आहेत. त्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी फडणवीसांच्या घरी आले, आणि तेथे सुमारे दीड तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती नाही. मात्र, काल देवेंद्र फडणवीस यांनी अचानकच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांची जबाबदारी स्वतःवर घेत सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यानंतर, संघ ही सक्रिय झाल्याचं आजच्या बैठकीतून दिसून येत आहे. 

१) देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयंसेवक असून ते सत्ताकारणात गेल्यानंतरही त्यांचे संघाशी जवळचे वैयक्तिक संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकदम सरकारमध्ये न राहण्याची आणि संघटनेचा काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नेमकं काय झालंय हे आजच्या बैठकीतून संघाकडून जाणून घेण्यात आलं असावं.

२) तसेच अशा स्थितीत काय करता येऊ शकेल या संदर्भात संघाकडून काही सूचना आणि सल्ला देण्यात आलं असावं अशीच शक्यता आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत जाणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी संघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी झालेली ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group