आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं. या विधानानंतर राजकीय पटलावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. दरम्यान, आता याच प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत संजय मंडलिक यांना सुनावलं आहे
छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे संजय मंडलिक शाहू महाराजांचे विरोधक आहेत. प्रचारभेत मंडलिक यांनी शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत. त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं, असं मंडलिक म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर राऊत यांनी खोचक भाष्य केलंय.
काय म्हणाले संजय राऊत ?
"छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्याचे खरे वारसदार नसतील तर मग संजय मंडलिक हे वारसदार आहेत का. माझ्या माहितीप्रमाणे सदाशिवराव मंडलिक हे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते. शाहू, फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच ते कोल्हापुरात काम करत होते. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची गादी आहे. त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानावर चिखलफेक केली जात आहे. हे चांगले लक्षण नाही," अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भूमिका घेतलेली आहे. ते आधीपासूनच सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी मंडलिकांनी ही भाषा वापरली. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी मंडलिकांनी दिला.