लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याआधी आज मुंबईत जोरदार राजकीय खडाजंगी रंगणार आहे. महायुती आणि मविआच्या एकाच दिवशी दोन मोठ्या सभा होत आहेत. मुंबईत आज इंडिया आघाडीची बीकेसी येथील मैदानात आणि महायुतीची दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे.
अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी मैदान अडविल्यावरून व भाजपला पाठिंबा दिल्यावरून टीका केली आहे.
या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत. त्यातील राज ठाकरे एक दुकान आहेत. तीन-चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोणीही येऊ दे, जितक्या सभा घेतील तितक्या त्यांच्या सीट कमी होतील. पंतप्रधान मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात, म्हणजे तुम्ही दहा वर्षांत काही केले नाही म्हणून येत आहात. असे असते तर ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागले नसते.
राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात, त्यांच्याबरोबरच जातात, ही राज ठाकरे यांची खासियत आहे, अशी जहरी टीका राऊत यांनी केली.
आज संध्याकाळी महाविकास आघाडीची सभा आहे. शिवतीर्थावर सभा व्हावी यासाठी आम्ही प्रथम अर्ज केला होता. मात्र, आमची सभा होऊ नये म्हणून पंतप्रधान आणि सुपारीबाज बोलविण्यात आले. हा सत्तेचा गैरवापर आहे. पण ठीक आहे बीकेसी मध्ये सभा होणार आहे. या सभेला मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.