राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधान पदासाठी अनेक नावांची चर्चा होत आहे. अशातच पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
इंडिया आघाडीकडून बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नावेही सुचवण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान पदाच्या या शर्यतीत राऊतांनी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत?, असा सवाल उपस्थित केला.
उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत,याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल. शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळले नाही. उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. आमच्याकडे जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही, अशा शब्दांत राऊतांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीवरून मोदींवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
सांगलीत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत,याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवाल त्यांनी केला.